कोविड भत्त्याच्या मागणीसाठी
दोनशे प्रशिक्षणार्थी डॉक्टर जिल्हाधिकार्यांच्या भेटीला!
घाटीत सेवा देणारे प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर्स अत्यल्प मानधनामुळे त्रस्त झाले असून कोविड काळातील प्रोत्साहनपर भत्ता मिळावा, यासाठी आज तब्बल 200 आंतरवासीता डॉक्टरांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली.
एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आंतरवासिता डॉक्टर्स घाटीत सेवा देत आहेत. 10 हजार 800 प्रति महिना एवढ्या अत्यल्प मानधनावर दोनशेहून अधिक आंतरवासिता डॉक्टर्स काळातही सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे या शहरात काम करणार्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 30 ते 50 हजारांपर्यंत मानधन देण्यात येते. मात्र औरंगाबाद येथील डॉक्टरांना केवळ 10 हजार 800 रुपये प्रतिमहिना मानधन मिळत आहे. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करणार्या या डॉक्टरला कोविड प्रोत्साहनपर भत्ता तातडीने द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.